फिलाडेल्फियाच्या कट्टय़ावर
रंगलं पुण्याचं सुरेल ‘मैतर’!
चार- पाच मित्रांनी एकत्र यावे आणि सहज गप्पा माराव्यात, त्या रंगाव्यात
तसा रंगलेला कार्यक्रम म्हणजे ‘मैतर’. हे ‘मैतर’ काल बृहन्महाराष्ट्र
मंडळाच्या १४ व्या अधिवेशनात फिलाडेल्फियाच्या कन्व्हेन्शन कट्टय़ावर
भेटलं आणि रसिकांशी रंगलेल्या सुरेल गप्पांनी सर्वाना भावलंदेखील.
शर्वरी जेमेनिसचे नवरंग नृत्य, संदीप खरेने नाना पाटेकरच्या ढंगात
सादर केलेली
कविता, सुबोध भावेच्या दिलखुलास गप्पा, नटसम्राटमधला अप्पासाहेब,
शौनक अभिषेकीने आपला मानमरातब विसरून मित्रांच्या शब्दांखातर
सादर केलेली
नाटय़कृती आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी सादर केलेले एव्हरीथिंग आय
डू इट.. हे प्रसिद्ध इंग्रजी गाणे हे या ‘मैतर’चे खिळवून ठेवणारे
आकर्षणिबदू
होते. ..पण अनेकांना अंतर्मुख केले ते संदीपने सादर केलेल्या श्याम
मनोहरांच्या शब्दांनी.. अपेक्षेप्रमाणेच या कार्यक्रमाला रसिकांनी
तुफान गर्दी केली. सुबोधच्या संवादाच्या शैलीने सुरुवातीलाच या
कार्यक्रमाची
पकड घेतली. तीन भागांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला. सर्वप्रथम सर्वानी
आपापल्या काही निवडक कलाकृती सादर केल्या. त्यानंतर आपल्याला आवडलेल्या
इतरांच्या कलाकृती व नंतरच्या भागात आपल्याला करायला आवडल्या असत्या
अशा कलाकृती
सादर केल्या. शेवटच्या भागात त्यांनी त्यांची कार्यक्षेत्रे बदलली
आणि इतरांच्या कार्यक्षेत्रातील सादरीकरण केले. म्हणजे शौनक अभिषेकीने
अभिनय,
शर्वरीने गाणे तर सलीलने कविता. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाच्या
अखेरीस सर्वानी मिळून एकत्र येवून तयार केलेले ‘आम्ही यात्रिक तेजाचे’
हे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या ओघातच मैत्रीचा ओघ कसा सुरू झाला
इथपासून ते मैत्री कशी घट्ट होत गेली इथपर्यंत सारे काही दिलखुलासपणे
सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या सादरीकरणातील अनौपचारिकपणामुळे
तो अधिक खुलत गेल्या. पुणेरी कोटय़ांना रसिकांची मनमुराद दाद मिळाली.
स्वत:ची
एक कविता नानाच्या ढंगात सादर करताना संदीप खरेने नाक फेंदारताच..
टाळ्यांच्या कडकडडाटात त्याला पावती मिळाली आणि वन्स मोअरही. मात्र
या सर्व रंगलेल्या
कार्यक्रमानंतर रसिकांना अंतर्मुख करून गेल्या त्या सारे काही पाहूनही
दगडासारख्या ढिम्म राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचे तिरकस वर्णन करणाऱ्या
श्याम मनोहरांच्या ओळी. ‘मैतर’ हा अधिवेशनातील गाजलेला कार्यक्रम
ठरला. |